Monday, January 1, 2018

महाराष्ट्र भूषण: मंगेश पाडगावकर

३० डिसेंबर 2017 म्हणजे मंगेश पाडगांवकर  यांचा द्वितीय स्मृती दिन  (थोडा उशीरच झाला आहे). २०१५ हे वर्ष चांगलं सरल असा विचार करत असता ३० डिसेंबरला अचानक बातमी आली की पाडगांवकर काका आपल्यात नाही. खूप हळ हळ वाटली, वाटलं की अरे  'या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे' अस सांगणारा, या जन्मावर स्वतः प्रेम करणारा आणि इतरांना प्रेम करायला शिकवणारा हळवा कवी हरपला.

पाडगांवकर काकांनी किती भरभरून दिल, कवितेचं दालन समृद्ध तर केलंच पण ती कविता खूप क्लिष्ट शब्दातून सोडवून साध्या सोप्या शब्दात आणली. कवितेचं मर्म सोप्या साध्या रोजच्या शब्दात प्रस्तुत करून ती कविता सर्व सामान्यानपर्यंत पोचवली आणि ती पोचली म्हणून ती कविता सगळ्यांना आपली वाटू लागली.

पाडगांवकर काकांची एकेक कविता आठवू म्हणजे लक्षात येईल की कविता कश्या होत्या,एकाहून एक सरस!

एक काळ होता की जेव्हा मराठीला वसंत बापट, विं दा करंदीकर आणि मंगेश पाडगांवकर असा बहर आला होता. तिकडे गदिमा आणि बाबूजींची घट्ट मैत्री तर इकडे मंगेश पाडगांवकर-श्रीनवस खळे किंवा मंगेश पाडगांवकर-यशवंत देवांची जोडी. अश्याच काळातील दिग्गजांच्या स्पर्शानं पावन झालेलं गीत म्हणजे


माझे जीवन गाणे 

व्यथा असो आनंद असू दे प्रकाश किंवा तिमीर असू दे
वाट दिसो अथवा न दिसू दे, गात पुढे मज जाणे !

कधी ऐकतो गीत झऱ्यातुन वंशवनाच्या कधी मनातुन
कधि वाऱ्यातुन, कधि ताऱ्यांतुन झुळझुळतात तराणे !

तो लीलाघन सत्य चिरंतन फुलापरी उमले गीतातुन
स्वरास्वरातुन आनंदाचे नित्य नवे नजराणे !

गा विहगांनो माझ्यासंगे सुरांवरी हा जीव तरंगे
तुमच्यापरि माझ्याहि स्वरांतुन उसळे प्रेम दिवाणे !

पंडित जितेंद्र अभिषेकी बुवांचा स्वर, पुलंनी बांधलेली भूप रागातील चाल आणि जीवन रसात ओथंबलेले शब्द, हीच खरी 'पाडगांवकरी'.

असच जीवनावर प्रेम करायला शिकवणार एक अजरामर गीत म्हणजे,

या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे

चंचल वारा, या जलधारा, भिजली काळी माती
हिरवे हिरवे प्राण तशी ही रुजून आली पाती
फुले लाजरी बघून कुणाचे, हळवे ओठ स्मरावे

या जन्मावर, या जगण्यावर, शतदा प्रेम करावे

शब्द वाचले की असं वाटतं की या पेक्षा आणखीन किती सोपे शब्द हवे? यशवंत देव आणि गायक अरुण दातेंच्या signature गीतातील एक.

जाता जाता सहज आठवलं म्हणून सांगतो, श्रावणात घन निळा बरसला हे आपण खुशाल पावसाचं किंवा  श्रावण गीत म्हणून ऐकतो. पण हे गीत काही श्रावणात किंवा पावसाळयात लिहिलेलं नाही तर भर उन्हाळ्यात लिहलं आहे! झाला असं की रोजच्या प्रमाणे मंगेश पाडगांवकर स्टेशन ला निघाले आणि  स्टेशनला पोचता पोचता घामानी चिंब झाले म्हणून त्यांनी ह्या ओळी  लिहिल्या श्रावणात घन निळा बरसला, रिमझिम रेशिमधारा  आणि श्रीनिवास खळेंना दिल्या. मधे २-४ मिनिटं गेली. खळेंनी विचारलं अरे पुढल्या ओळी? मग मधल्या प्रवासात श्रावणात घन निळा  संपूर्ण लिहून झालं आणि  मंगेश पाडगांवकरांनी  तो कागद प्रवासातच खळेंपर्यंत पोचता केला. शेवटल्या स्टेशनला दोघे उतरले मंगेश पाडगावकर आपल्या ऑफिसला जायला निघाले इतक्यात श्रीनिवास खळेंनी आवाज दिला अरे चाल तर ऐकून जा! या गीताची आणखीन एक विशेषता म्हणजे लता दीदींचा स्वर तर आहेच पण बासरी वाजवली आहे ती हरी प्रसाद चौरासियांनी!

श्रावणात घन निळा बरसला रिमझिम रेशिमधारा
उलगडला झाडांतुन अवचित हिरवा मोरपिसारा

जागून ज्याची वाट पाहिली ते सुख आले दारी
जिथेतिथे राधेला भेटे आता श्याम मुरारी
माझ्याही ओठांवर आले नाव तुझेच उदारा

जीवनावर प्रेम करणारा हा कवी एके ठिकाणी म्हणतो की "आईनी किंवा बायकोने केलेल्या उत्तम आमटीचा भुरका मारताना फुर्र असा जो आवाज येतो तो मला ओंकाराइतकाच पवित्र वाटतो." वा क्या बात हैं।


आम्ही मराठी भाषिक लहानपणापासून पाडगांवकर ऐकतच मोठे होतो. अगदी परदेशात राहून देखील पाडगांवकर ऐकले नाहीत असा माणूस नाही, कस? तर....

सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय? 
हे बालगीत शाळेत लहान असताना न ऐकलेला मराठी कदाचित शोधून सापडणार नाही. एकाहून एक सरस आणि सकस बालगीत लिहिणारा कवी म्हणजे मंगेश पाडगांवकर.
आम्ही कोळ्यांची पोरं हाय हो
टप टप पडती अंगावरती प्राजक्ताची फुले
चांदोमामा चांदोमामा
सुट्टी एके सुट्टी


पाडगांवकरांच्या पिढीत कवी बा भ बोरकर हे आदर्श होते. आजच्या कवींसाठी मंगेश पाडगांवकर हे नक्कीच स्फूर्ती स्थान आहे. आजचा आघाडीचा कवी संदीप खरेच्या कविता वाचताना हे लक्षात येत त्यात काही वाईटही नाही, याला मी संस्कार म्हणीन. संदीप खरे सांगतोदेखील की त्याच्या लव्ह लेटर या कवितेचं स्फूर्ती स्थान पाडगांवकरांच्या 'प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं' ह्यात आहे.

हळुवार जाणारी प्रेम/रोमँटिक कविता लिहिणारे एक पाडगांवकर आणि आपल्या पोकळ भोंगळ 'सिस्टिम' वर 'सलाम' कवितेतून घणाघाती घाव घालणारे पाडगांवकरही तेच का? असा प्रश्न पडल्यावाचून राहत नाही.

पाडगांवकर हे बहुरंगी कवी, कुठे स्वछंद रंग, कुठे विरह, कुठे बालरंग, प्रेमरंग ही त्यांची विशेषता. 

पण मला भावणारे पाडगांवकर हे जीवनरंगातला आनंद रंग दाखवणारे अधिक आहेत.

या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे

रंगांचा उघडुनिया पंखा सांज कुणी ही केली ?

काळोखाच्या दारावरती नक्षत्रांच्या वेली
सहा ऋतूंचे सहा सोहळे, येथे भान हरावे

म्हणणारे पाडगांवकर वाचले/ऐकले  की असं वाटतं की hats  off! जीव ओवाळून टाकावा त्या शब्दांवर.
लिहितो म्हंटलं तर शब्द कमी पडतील, आणि माझी काय लायकी पाडगावकरांवर लिहायची? पण काय करणार मी मैफलीतला एक मनस्वी श्रोता आहे दाद देणं हा माझा धर्म!
मी आणि माझा मित्र अभिजित देवघरे यांच्याकडून पाडगांवकर काकांना छोटीशी श्रद्धांजली.


-अमोल दांडेकर

ऋणनिर्देश: व्यंगचित्र अभिजीत देवघरे



#स्वछंद रंग

एकट्याने एकटे गर्दीत चालावे
एकट्याने आपल्याशी फक्त बोलावे

एकट्याला हाक येते रानपक्ष्याची
एकट्याने पाखरू प्राणांत झेलावे

#प्रेमरंग

जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा,

आभाळ भाळ होते, होती बटाही पक्षी
ओढून जीव घेते, पदरावरील नक्षी
लाटाच अंतरीच्या, नाही मुळी निवारा
जेव्हा तुझ्या बटांना उधळी मुजोर वारा, 
जेव्हा तुझा बटांना

लाजून हसणे अन
शब्दावाचून कळले सारे
शुक्र तारा मंद वारा


# विरह

डोळ्यांत सांजवेळी आणू नकोस पाणी
त्या दूरच्या दिव्यांना सांगू नको कहाणी

कामांत गुंतलेले असतील हात दोन्ही
तेव्हा नको म्हणू तू माझी उदास गाणी